
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
या शिष्टमंडळात सुरुवातीला ठाकरे गटातील कोणत्याही खासदाराचा समावेश करण्यात आलेला नव्हता, यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी संसदेत ठाकरे गटाचे संख्याबळ अधोरेखित करत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता.
यानंतर, केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली आणि ठाकरे गटातून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश करण्यात येत असल्याची माहिती दिली. शिवसेनेकडूनही ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हे शिष्टमंडळ देशाच्या हितासाठी आणि दहशतवादाविरुद्ध आहे, आणि त्यामुळे या राष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा दिला जाईल. त्यांनी असेही नमूद केले की, शिष्टमंडळात कोणाची नियुक्ती केली जात आहे, याबाबत पक्षांना योग्य वेळी माहिती देण्याची केंद्र सरकारने काळजी घ्यावी, जेणेकरून गैरसमज टाळता येतील.
ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारकडे लवकरच ‘पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण एक आहोत. सशस्त्र दलांच्या कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांची जबाबदारीही विचारात घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत.