
सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशातील घाऊक महागाई दरात (Wholesale Inflation) मार्च महिन्यात लक्षणीय घसरण झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2025 मध्ये महागाई दर वार्षिक आधारावर 2.05% इतका नोंदवला गेला, जो तज्ज्ञांच्या 2.5% च्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.
घाऊक महागाईतील या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अन्नपदार्थ, वीज, वस्त्र आणि इतर प्राथमिक वस्तूंच्या किंमतींतील मर्यादित वाढ. मार्च महिन्यात घाऊक अन्नधान्य महागाई फेब्रुवारीच्या 5.94% वरून 4.66% वर आली. त्याचबरोबर, प्राथमिक वस्तूंची महागाई 2.81% वरून 0.76% इतकी घसरली आहे.
उन्हाळ्याचा परिणाम महागाईवर
दरम्यान, देशभरात वाढलेल्या तापमानामुळे महागाईविषयी नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे पालेभाज्या आणि फळांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बोफा ग्लोबल रिसर्चचे भारत-आसियान प्रमुख राहुल बाजोरिया यांनी यावर लक्ष वेधले असून, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे काही प्रमाणात किरकोळ महागाईत वाढ होऊ शकते.
किरकोळ महागाईचा आलेख खाली
फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) 3.61% वर पोहोचली होती, जी गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी होती. जानेवारीमध्ये हा दर 4.31% होता. त्यामुळे महागाईतील घट दिसून येत आहे.
आरबीआयचा (RBI) अंदाज आणि दिलासा
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2025-26 आर्थिक वर्षासाठी महागाईदर 4% वर स्थिर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. फेब्रुवारीमध्ये हा अंदाज 4.2% इतका होता. पुढील आर्थिक वर्षात महागाईदर अधिक घटण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होईल.
आरबीआयच्या अंदाजानुसार:
Q1 (एप्रिल-जून) : 3.6%
Q2 (जुलै-सप्टेंबर): 3.9%
Q3 (ऑक्टोबर-डिसेंबर): 3.8%
Q4 (जानेवारी-मार्च): 4.4%
थोडक्यात सांगायचं झालं तर घाऊक आणि किरकोळ महागाईत झालेली घसरण ही अर्थव्यवस्थेसाठी आणि सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. जरी वाढत्या उन्हामुळे काही अन्नपदार्थांच्या किंमतीत चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी आरबीआयच्या अंदाजानुसार देशात महागाईवर नियंत्रण मिळण्याची दिशा दिसते आहे.