बोईसर (पालघर) – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामादरम्यान करण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे पालघर जिल्ह्यातील गोवणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांना गंभीर स्वरूपाचे तडे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागातील रहिवाशांनी घरे धोकादायक अवस्थेत गेल्याची तक्रार करून नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडे धाव घेतली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यांतून मार्ग जात असून, तिथे सध्या खांब उभारणीसाठी ३० ते ४० फूट खोल खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. या खड्ड्यांमधील दगड फोडण्यासाठी रात्रीच्या वेळेस भुसुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमुळे परिसरात जमिनीला हलक्या स्वरूपाचे भूकंपसदृश हादरे बसत असून, परिणामी गावातील अनेक घरांच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

गोवणे गावातील वायेडा पाडा व गावठाण पाडा या आदिवासी वसाहतींतील सुमारे १० ते १२ घरांना या स्फोटांमुळे तडे गेले असून, काही घरे अक्षरशः राहण्यास अयोग्य ठरत आहेत. घरांमध्ये भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे पडले असून, छताच्या भागातही नुकसान झाल्याचे चित्र आहे. यामुळे या कुटुंबांना दररोज जीव मुठीत धरून घरात राहावे लागत आहे.

“रात्रीच्या वेळेस जोरदार आवाजाने भुसुरुंग फोडले जातात. त्या स्फोटांमुळे जमिनीला हादरे बसतात. आमच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, काही घरांचे छप्परही हलले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत काहीच झाले नाही,” असे गोवणे येथील तक्रारदार ग्रामस्थ बारक्या वायेडा यांनी सांगितले.

या तक्रारीची दखल घेत तलाठी रसिका पाटील यांनी सांगितले की, “या प्रकरणी संबंधित घरांची स्थळपाहणी करून पंचनामा करण्यात येणार आहे आणि त्यानंतरचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल.”

या आधीही पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत डोंगरफोडीमुळे घरांचे नुकसान होण्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गासाठी टेकड्या फोडताना गंजाड, किराट व नवनाथ गावातील घरांना तडे गेले होते आणि काही घरांवरील पत्रे व कौले स्फोटांमुळे उडून गेली होती. त्या वेळी स्थानिकांच्या दबावामुळे ठेकेदार कंपनीने काही प्रमाणात नुकसान भरपाई दिली होती.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम करताना स्थानिकांच्या सुरक्षिततेचा आणि घरांच्या संरचनेचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल प्रशासन आणि प्रकल्प कार्यालय यांची यामध्ये तातडीने समन्वय आवश्यक आहे, अन्यथा या प्रकारांमुळे प्रकल्पात अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.