कराड : मंगळवारी सायंकाळी कराड व मलकापूर शहरात अचानक सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वीजा आणि जोरदार पावसाने मोठा कहर केला. या अवकाळी पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले असून, अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. पुणे-बंगळुरू महामार्गासह अन्य रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनधारक व प्रवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत

कमालीच्या उष्म्यानंतर अचानक कोसळलेल्या वादळी पावसामुळे अनेक भागांत गारांचा खच साचला. झाडे उन्मळली, विजेचे खांब वाकले, तर कच्ची घरे आणि झोपड्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने आणि अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्या माहितीनुसार, पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, काढणी न झालेल्या ज्वारी, गहू आणि भाजीपाला खराब झाला.

वाहतुकीला फटका, प्रवाशांची तारांबळ

वादळी पावसामुळे चाकरमान्यांसह शाळकरी मुले, छोटे उद्योजक आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते तळ्यासारखे दिसू लागले. कराडच्या भाजी मंडईतील विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. दत्त चौकात कलिंगड विक्रेत्यांचे कलिंगड रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेले, तर उरलेला माल वाचवण्यासाठी विक्रेत्यांना प्रयत्न करावे लागले.

हॉटेलच्या काचा फुटल्या, महामार्गावरील वाहतूक प्रभावित

पुणे-बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फुटल्या. पावसाचे पाणी हॉटेलच्या आत शिरल्याने मोठे नुकसान झाले.

पावसानंतर वातावरणात गारवा

वादळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आणि वातावरणात गारवा पसरला. उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. विशेषतः लहान मुले आणि युवकांनी पावसात भिजण्याचा आणि गारा वेचण्याचा आनंद घेतला. सुमारे सव्वा तासानंतर पावसाचा जोर ओसरू लागला, आणि शहरातील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली.