
बंगळुरू : बंगळुरू येथे राहणाऱ्या आणि मूळ महाराष्ट्रातील असलेल्या राकेश खेडेकर याने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह सुटकेस मध्ये लपवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर थेट आपल्या वडिलांना फोन करून संपूर्ण प्रकाराची कबुली दिली. या घटनेने संपूर्ण कुटुंब, परिसर आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
राकेश खेडेकर आणि गौरी खेडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही मूळचे महाराष्ट्रातील असून काही महिन्यांपूर्वीच बंगळुरूतील एका घरात भाड्याने राहायला आले होते. गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती. घटनेच्या दिवशी राकेश आणि गौरी यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात राकेशने पत्नीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून वॉशरूममध्ये ठेवला. या घटनेनंतर राकेशने घाबरून आपल्या वडिलांना फोन केला.
“मी तिला मारलं आणि आता आत्महत्या करणार” — आरोपीचा वडिलांना फोन
या घटनेबाबत राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मुलाचा मला फोन आला. तो म्हणाला, बाबा, ती रोज भांडण करत होती म्हणून मी तिला संपवलं. आता मी सुद्धा आत्महत्या करणार आहे. हे सर्व तिला, तिच्या आईला आणि सगळ्यांना सांग.”
या फोननंतर वडिलांनी त्वरित राकेशला शांत राहण्यास सांगितले आणि पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून राकेशला महाराष्ट्रातून अटक केली आणि पुढील तपासासाठी बंगळुरूला नेले.
पीडितेच्या आईवर आणि कुटुंबावर दुहेरी धक्का
या घटनेचा आणखी एक वेदनादायक भाग म्हणजे, आरोपी राकेशच्या वडिलांनीच स्पष्ट केले की, गौरी ही त्यांची सख्खी भाची होती. राजेंद्र खेडेकर म्हणाले, “गौरी ही माझी सख्खी बहिणीची मुलगी होती. सुरुवातीला आम्ही या लग्नाला विरोध केला होता. ती मुलगी वेडी आहे, त्रास देते, असेही आम्ही अनेकदा सांगितले होते. पण दोघेही लग्नावर ठाम राहिले. त्यामुळेच आम्ही लग्न लावून दिलं. लग्नानंतरही ती सतत भांडण करत असे. तिने आमच्या दुसऱ्या मुलालाही मारहाण केली होती.”
आधीपासूनच सुरू होते वाद
हत्या होण्याच्या काही दिवस आधी आरोपीने पत्नीच्या आईला फोन करूनही तक्रार केली होती. तो म्हणाला होता की, गौरी सतत भांडण करते, त्रास देते. या नातेसंबंधात सुरुवातीपासून तणाव होता हे देखील समोर आले आहे.
पोलिसांकडून अधिक तपास
या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक करून बंगळुरूला नेले आहे. गौरीच्या कुटुंबीयांकडूनही गंभीर आरोप होत असून या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.