
मुंबई – वांद्रे पूर्व परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या २३ वर्षीय पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना घडली. यात संबंधित महिला गंभीर भाजली असून तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी महिलेचे नाव सिमरन सलमान कुरेशी (२३) असे असून त्या वांद्रे पूर्वेतील बेहरामपाडा येथील लकडेवाला गल्लीत पतीसह वास्तव्यास होत्या. पती सलमान इरशाद कुरेशी (३४) हा कपड्यांचा व्यवसाय करतो.
सतत वाद आणि संशय
२१ मार्च रोजी सिमरन आणि सलमान यांच्यात घरगुती वाद झाल्यानंतर संतापलेल्या सलमानने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने घरातील रॉकेल आणून सिमरनच्या अंगावर ओतले आणि माचिसची काडी पेटवत तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर गंभीर भाजलेल्या सिमरनला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ती सध्या ४५ टक्के भाजली असून तिची स्थिती गंभीर पण स्थिर आहे.
आईच्या जबाबानंतर उघड झाला प्रकार
उपचारादरम्यान मुलीची स्थिती थोडी स्थिर झाल्यानंतर तिच्या आईने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. आई गौरी कुरेशी (४५) यांच्या जबाबावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात आरोपी सलमान विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पती अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम १०९, ७९, ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा याआधीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.