
नागपूर: औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, “नागपूरच्या महाल भागात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.”
मुख्यमंत्र्यांनंतर केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांततेचे आवाहन करत, “कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा,” असे म्हटले आहे.
पोलिसांचा लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर
चिटणीस पार्क आणि महाल भागात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. कोतवाली आणि गणेशपेठ भागातही हिंसाचाराचे लोण पसरल्याची माहिती मिळाली आहे. समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करत वाहनांची तोडफोड केली.
वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
दंगेखोरांनी ई-रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. दुचाकींचीसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे महाल परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
प्रकरण नेमके काय?
सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिवाजी चौकाजवळ एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. विश्व हिंदू परिषदच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा गट संतप्त होता. यानंतर दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी केल्याने वाद वाढला. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवले, मात्र त्यानंतर भालदारपुरा दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, महाल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.