
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयाने संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघातील खेळाडूंनीही हा आनंद उत्साहात साजरा केला. विशेषतः कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भरमैदानात हातात स्टंप घेऊन दांडिया खेळत अनोखे सेलिब्रेशन केले, जो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताचा दमदार विजय
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या बदल्यात २५१ धावा केल्या. डॅरिल मिशेल (६३) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत ६ विकेट्स गमावत २५४ धावा करत सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या ७६ धावांच्या खेळीने विजयाचा मजबूत पाया रचला, तर श्रेयस अय्यर (४८), शुभमन गिल (३१), अक्षर पटेल (२९) आणि केएल राहुल (नाबाद ३४) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
रोहित-विराटची दोस्ती आणि खास सेलिब्रेशन
सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली अनेकदा रणनीती आखताना दिसले. विजय मिळताच दोघांनी हातात स्टंप घेऊन मैदानातच दांडिया खेळला. त्यांच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
भारताचे सलग दुसरे आयसीसी विजेतेपद
या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. संपूर्ण संघाचा हा ऐतिहासिक जल्लोष क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला आहे.