
दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने ४९व्या षटकात ६ विकेट्स गमावत हे लक्ष्य सहज पूर्ण केले. विराट कोहलीने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
भारतीय संघाने याआधी २०१३ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. आता सलग तिसऱ्यांदा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात भारतीय खेळाडूंनी मुंबईच्या महान फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून काळ्या पट्ट्या परिधान केल्या होत्या.
या विजयामुळे भारताने तब्ब्ल १४ वर्षांनंतर आयसीसी नॉकआउट सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. आता भारतीय संघ अंतिम फेरीत कोणाशी भिडणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.