
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीस शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भविष्यात बसस्थानकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
महिला सुरक्षेसाठी उचललेली ठोस पावले:
- सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवली जाणार.
- सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार.
- सर्व बस डेपोचे सुरक्षा ऑडिट करण्यात येणार.
- परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय.
- एसटी आगारातील भंगार वाहने १५ एप्रिलपर्यंत हटवण्यात येणार.
- शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल.
- बस डेपोंमध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार.
आरोपी अद्याप फरार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (३७) अद्याप फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ विशेष पथकांची स्थापना केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला आरोपीबाबत माहिती असेल तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
ही घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी असून, सरकारकडून महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. मात्र, या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.