रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, आणि पोलादपूर तालुके हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. मात्र, शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन प्रमुख गट निर्माण झाले, ज्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलली आहेत.
उध्दव ठाकरे गटाने स्नेहल जगताप यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचार मोहिमेत उध्दव गटामध्येच दोन वेगळे गट तयार झाले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या समर्थकांमध्ये मतभेद असून, याचा थेट फटका स्नेहल जगताप यांच्या प्रचारावर दिसून आला.
गेल्या अडीच वर्षांत विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. या बदलांमुळे अनेक नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी निष्क्रिय झाले आहेत. प्रचाराच्या काळातही या वादाचा परिणाम दिसून आला. विशेषतः आनंद गीते यांच्या गटाचे अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते स्नेहल जगताप यांच्या प्रचारात सक्रिय दिसले नाही.
याशिवाय, स्नेहल जगताप यांच्या निकटवर्तीय कुटुंबातील काही सदस्यांमुळे स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. काही कार्यकर्त्यांनी आपले पद सोडण्याची तयारी दर्शवली असून, यामुळे पक्षाची ताकद कमी होण्याचा धोका आहे.
दुसरीकडे, या गोंधळाचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांना होण्याची शक्यता आहे. उध्दव गटातील गटबाजी आणि नाराजीमुळे भरत गोगावले यांचा जनतेवरील प्रभाव वाढण्याची चिन्हे आहेत.