
मुंबईतील नामांकित शाळेतील ४० वर्षीय इंग्रजी शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटकेत असलेल्या शिक्षिकेच्या मोबाईलमधून काही चॅट्स, हॉटेल बुकिंग्ज आणि विद्यार्थ्यासोबत काढलेले फोटो व व्हिडिओज जप्त करण्यात आले आहेत.
शिक्षिकेच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्याशी संबंधित आक्षेपार्ह संभाषण व त्याच्याशी लज्जास्पद वर्तनाचे पुरावे मिळाले असून, तिच्या नावावर किंवा तिच्या मित्राच्या नावावर दक्षिण मुंबई व अंधेरी परिसरातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग्स करण्यात आले होते. यामुळे शिक्षिकेने हेतुपुरस्सर योजना आखून विद्यार्थ्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणामुळे संबंधित शाळेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्याचे शाळा सोडल्यानंतरही शिक्षिकेचा त्याच्याशी संपर्क सुरू होता आणि ती त्याला भेटण्यासाठी दबाव टाकत होती. शाळेने या शिक्षिकेविरोधात आतापर्यंत कोणतीही स्पष्ट कारवाई जाहीर केली नाही.
पीडित विद्यार्थ्याची मानसिक व वैद्यकीय स्थिती तपासण्यासाठी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याला दिल्या गेलेल्या चिंताविरोधी औषधांचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणात शिक्षिकेच्या मैत्रिणीची भूमिका देखील गंभीर असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. तिने विद्यार्थ्याला अश्लील विचारधारा स्वीकारण्यास प्रवृत्त केले आणि गैरसंबंधास सामान्य ठरवत त्याचं मानसिक रूपांतर केलं. तिच्यावरही POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल असून तिला लवकरच पोलिस कोठडीत घेण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला असून, बाल लैंगिक शोषणाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शिक्षिकेचा मोबाईल, लॅपटॉप, हॉटेल सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून, चार्जशीट लवकरच न्यायालयात दाखल केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकारानंतर शाळा व्यवस्थापनावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये मानसिक आरोग्य सत्रे, सुरक्षित संवादासाठी हेल्पलाईन आणि कठोर देखरेखीची व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित होत आहे.