
नेपीडॉ / बँकॉक : एकीकडे गृहयुद्ध, दुसरीकडे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या म्यानमारवर आता भूकंपाचं भीषण संकट कोसळलं आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, १६७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ३० लाख नागरिकांना आपली घरं सोडावी लागली आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराजवळ, मंडालेपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर होता. रिष्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपानंतर लागोपाठ सात धक्के बसले असून, त्यात अनेक इमारती, घरे जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असून, बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ते, महामार्ग, पूल यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, हा भूकंप १० किलोमीटर खोल भूभागात झाला होता. यानंतर आणखी ६.४ तीव्रतेचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि थायलंड सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली असून, म्यानमारच्या लष्करशाहीने सहा प्रांतांत विशेष आपत्कालीन स्थिती लागू केली आहे.
भूकंपाचे धक्के पाच देशांना जाणवले
या शक्तिशाली भूकंपाचे परिणाम केवळ म्यानमार आणि थायलंडपुरते मर्यादित राहिले नाहीत. बांगलादेश, लाओस, चीन व भारताच्या सीमावर्ती भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये धक्के जाणवले, मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
भारत म्यानमार व थायलंडच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करताना सांगितले की, “अडचणीच्या प्रसंगी भारत म्यानमार आणि थायलंडच्या सोबत उभा आहे. या दोन्ही देशांना आवश्यक ती सर्व मदत करण्यास भारत तयार आहे.” त्यानुसार भारताने तत्काळ मदतकार्यासाठी मदतीचा हात पुढे करत आवश्यक साहित्य आणि आपत्कालीन पथके पाठवली आहेत.