
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. महिलांना एक खून माफ करण्याची संकल्पना त्यांनी मांडली असून, त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे.
महिलांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा
ट्विटरवर पोस्ट करत रोहिणी खडसे म्हणाल्या,
“सर्वप्रथम, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या शांततेच्या विचारांवर चालणारा आहे. मात्र, देशातील महिला दिवसेंदिवस अधिकाधिक असुरक्षित होत आहेत. नुकतेच मुंबईमध्ये १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. महिलांवरील अत्याचार, अपहरण, घरगुती हिंसाचार वाढत असून, जागतिक सर्वेक्षणांनुसार भारत महिलांसाठी आशियातील सर्वात असुरक्षित देश आहे. त्यामुळे महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी एक खून माफ करण्याचा अधिकार मिळावा, अशी आम्ही मागणी करतो.”
मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत @rashtrapatibhvnविषय :- एक खुन माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा… pic.twitter.com/bE8JMogdZ7
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 8, 2025
“आम्हाला खून करायचा आहे…”
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या,
“आम्हाला कुणाचाही जीव घ्यायचा नाही, पण अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा, बलात्कारी मानसिकतेचा आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा खून करायचा आहे. इतिहास साक्षी आहे की संकटाच्या वेळी महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उचलली होती. मग आमच्या हक्कांसाठी आम्ही मागे का राहावे? राष्ट्रपती महोदया, आपण आमच्या या मागणीचा विचार करावा आणि महिलांना योग्य न्याय मिळावा, हीच आम्हाला जागतिक महिला दिनाची खरी भेट ठरेल.”
ही मागणी समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली असून, यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.