
राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही समोर आले. भाजप आमदार मोहन मते आणि अन्य आमदारांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
विशेष म्हणजे, ७,६३४ कोटींपैकी ६,००० कोटी रुपयांची फसवणूक केवळ पुणे जिल्ह्यातीलच आहे. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, त्याठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड येथे अत्याधुनिक सायबर गुन्हे विभाग सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्प
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापे, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील.
सायबर चोर विविध युक्त्या वापरून नागरिकांना फसवत आहेत. ते नकली पोलिस किंवा कस्टम अधिकारी बनून फोन करतात आणि मनी लॉंड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा बनाव करतात. त्यामुळे नागरिक घाबरून त्यांच्या सांगण्यावर पैसे पाठवतात. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आणि संशयास्पद कॉल्सला प्रतिसाद न देणे हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे.