
होळी आणि जत्रांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी, सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांची सेवा २१ मार्चपर्यंत तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
सीएसएमटीतील कामांमुळे बदल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी अलीकडेच त्याची पाहणी केली. गेल्या काही महिन्यांपासून १०, ११, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यातील १० आणि ११ क्रमांकाचे काम पूर्ण झाले असले तरी, १२ आणि १३ क्रमांकाच्या फलाटांचे काम अद्याप प्रलंबित आहे. हे पायाभूत काम २०२४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे लक्ष्य होते, मात्र विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे बदलले
तेजस, जनशताब्दीसारख्या महत्त्वाच्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत, तर मंगळुरू एक्सप्रेस ठाण्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. हा बदल २१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सामान घेऊन लोकल किंवा टॅक्सीचा पर्याय निवडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गांभीर्याने विचार करावा आणि पर्यायी सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.