
पुणे येथे बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, तसेच मुंबई, ठाणे आणि अन्य शहरांतील वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी होणार आहेत.
महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था चर्चेचा विषय
पुण्यातील अत्याचार प्रकरणासोबतच बीडमध्ये सरपंचाच्या हत्येचा मुद्दाही चर्चेत आहे. तसेच राज्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात गुंडांनी तलवारी आणि कोयत्यांसह दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक
मुख्यमंत्री फडणवीस ठाण्यातील रेमंड गेस्ट हाऊसमध्ये पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून, कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. राज्यभरातील पोलिस अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप
ठाण्यात पोलिस क्रीडा स्पर्धा सुरू असून, त्याचा समारोप शनिवारी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीद्वारे पोलिस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकार कोणते ठोस निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.