
हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा
पुणे – स्वारगेट (पुणे) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी महत्त्वाचे आदेश दिले. महामार्गांवरील खासगी हॉटेल आणि ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करण्याचे निर्देश त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सर्व एसटी बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एसटी व पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाचे फलक लावणे आणि जिल्ह्यातील सर्व आगारांची पाहणी करणे यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष निर्देश
दूर पल्ल्याच्या एसटी बसेस महामार्गांवरील खासगी ढाबे आणि हॉटेलवर थांबतात. या ठिकाणी प्रवाशांना योग्य सुविधा मिळतात का, स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्थिती कशी आहे याची तपासणी करण्याचा आदेश विखे यांनी दिला आहे.
“ढाबेचालकांनी ठरवलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. चालक आणि वाहकांना मोफत जेवणाच्या सुविधा मिळतात, परंतु प्रवाशांना काय मिळते, याकडेही लक्ष द्या,” असे विखे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पुढील महत्त्वपूर्ण बैठक
जिल्ह्यातील एसटी व्यवस्थापन आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत विशेष बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले.