
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. आता आणखी एका महिलेला टॅक्सी प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागला.
21 फेब्रुवारी रोजी आयटी क्षेत्रात कार्यरत असणारी एका महिलेने आपलं काम संपवून रात्री घरी परततेवेळी कॅब बुक केली. सुरुवातीला प्रवास सामान्य वाटत होता. मात्र काही वेळातच कॅब चालक सुमित कुमार याने आरश्यामधून वारंवार तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट लक्षात येताच महिला घाबरली, मात्र प्रसंगावधान राखत तिने सिग्नलला गाडी थांबताच पटकन कॅबमधून बाहेर पडून पळ काढला. दोन किलोमीटर अंतर धावत ती थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत संबंधित अॅपमधून वाहन क्रमांक मिळवला आणि आरोपी सुमित कुमार याला अटक केली. मात्र, काही वेळातच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
या घटनांमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक आणि कॅब सेवांमध्ये महिला सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाने या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावी, अशी मागणी नागरिक आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून होत आहे.