
स्वारगेट एस.टी. बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.
आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) असे असून, त्याच्या विरोधात जबरी चोरीचे दोन गुन्हे आधीच दाखल आहेत.
कशी घडली घटना?
पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर आली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी संवाद साधून गोड बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला दिशाभूल करत एका बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले.
बसमध्ये अंधार असल्याने आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले. तरुणी आत गेल्यानंतर आरोपीही तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला आणि दरवाजा बंद करून जबरदस्तीने अत्याचार केला.
पीडितेने पोलिसांकडे केली तक्रार दाखल
अत्याचारानंतर तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली, मात्र नंतर तिने हा प्रकार स्वारगेट पोलीस ठाण्यात सांगितला. पोलिसांनी तातडीने स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटली.
पोलिसांची कारवाई सुरू
स्वारगेट पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात आधीच जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
या घटनेमुळे एस.टी. स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.