
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपी अफान याने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हत्या करण्यामागचे कारण:
अफानच्या कुटुंबाचा आखाती देशांमध्ये व्यवसाय होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय डबघाईला आला आणि कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला. याच मानसिक तणावातून त्याने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्याच्या जबानीवर विश्वास न ठेवता सखोल तपास सुरू केला असून, त्याचा मोबाईल जप्त करून कॉल रेकॉर्ड्स आणि ड्रग्सशी संबंधित कोणताही संबंध आहे का, याची चौकशी केली जात आहे.
नेमक्या या सर्व हत्या कशा घडल्या?
पहिली हत्या:
२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अफान आपल्या आजी सलमा बीबी यांच्या घरी गेला. तिथे त्याने हातोडीने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर त्याने हातोडी स्वच्छ करून घर सोडले.
दुसरी आणि तिसरी हत्या:
यानंतर तो पाच किलोमीटर दूर असलेल्या काका लतीफ यांच्या घरी गेला. काका समोर येताच त्याने त्यांच्यावर हातोडीने हल्ला केला आणि त्यांना ठार मारले. त्यानंतर काकी सजिदा यांच्यावरही तोच क्रूर हल्ला करत त्यांचा मृत्यू निश्चित केला.
चौथी हत्या:
काका-काकीला ठार केल्यानंतर अफान आपल्या घरी परतला. घरात त्याला १३ वर्षीय धाकटा भाऊ एहसान दिसला. त्याच्यावरही हातोडीने तडातड वार करून त्याचा जीव घेतला.
आईवर हल्ला:
यानंतर पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने आई शाहिदा यांच्या डोक्यावर हल्ला केला. काही घाव घातल्यानंतर त्याला वाटले की त्या मृत झाल्या आहेत, मात्र त्या जिवंत राहिल्या आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पाचवी हत्या:
यानंतर त्याने शेजारी राहणाऱ्या प्रेयसी फरशाना हिला बोलावून घेतले. तिला एका खोलीत नेऊन हातोडीने डोक्यावर हल्ला केला आणि ठार मारले.
आफानचा आत्महत्येचा प्रयत्न आणि पोलिस तपास:
सर्व हत्या केल्यानंतर अफानने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याने उंदीर मारण्याचे औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अफानच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि त्याच्या मानसिक स्थितीबद्दल चौकशी केली जात आहे. त्याचा ड्रग्जशी काही संबंध आहे का, हेही तपासले जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण केरळ हादरले आहे.