मालाड:मढ चर्च ते मढ जेट्टी हा मुख्य रस्ता सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असल्याने स्थानिक रहिवासी, पर्यटक, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. S. Kumar Group – Shri Siddhi Kumar Infrastructure Pvt. Ltd. यांच्याकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा अर्ध्याहून अधिक भाग अजूनही अपूर्ण आहे. कामगारांना वेळेवर पगार न मिळाल्यामुळे आणि यंत्रसामग्रीच्या अभावामुळे अनेकदा कामे ठप्प पडत आहेत. परिणामी, या परिसरातील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
नागरिकांच्या समस्या:
या रखडलेल्या कामामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक विशेषतः त्रस्त झाले आहेत. शाळेच्या बसेस आता मढ चर्च येथे थांबत असल्याने पालकांना मढ जेट्टीवरून चर्चा येथे जाऊन विद्यार्थ्यांना घेऊन यावे लागते. दोन वेगवेगळ्या वेळांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या पालकांना चार फेऱ्या कराव्या लागतात, ज्यामुळे त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होतोय.
याशिवाय, स्थानिक कामगार वर्गाला देखील मोठ्या आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत.भाटी,अक्सा,कृष्णा आदिवासी पाडा येथील वर्सोवा येथून कामाला जाणाऱ्या कामगारांना मढ चर्च पर्यंत बस नंतर दुसऱ्या ऑटोने मढ जेट्टीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येकी २० रुपये जास्त खर्च करावा लागतो. एका कुटुंबातील दोन-तीन सदस्यांना महिन्याकाठी १२०० ते १८०० रुपये अतिरिक्त खर्च येत आहे, जो त्यांच्यासाठी मोठा आर्थिक भार आहे. कमी पगार मिळणाऱ्या कामगारांना तीन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतोय.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा रोष:
रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार आणि ढिसाळपणामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, क्यूआर कोड, जीपीएस ट्रॅकर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. मात्र, या नियमांचे पालन कुठेच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मढ-वर्सोवा ब्रीजचे कामही अद्याप प्रलंबित असून, पर्यावरणीय परवाने, जिल्हाधिकारी परवाने, आणि न्यायालयीन आदेश यांसाठी प्रतीक्षा सुरू आहे. वर्सोवा बोटीचा धक्का तयार करण्यासाठी निधी मंजूर झाला.काम ही होत आहे यावरून लक्षात येते की पुढील पाच वर्ष तरी ब्रीज होणे कठीण आहे….