विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. मात्र, निकाल लागल्यानंतर तब्बल आठ दिवस उलटले तरीही सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने मोठ्या राजकीय हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू
महायुतीचं नेतृत्व भाजपाच्या हातात असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे यांची भूमिका
एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरेगावमध्ये असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकार स्थापनेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. “मी नेहमी माझ्या गावी येत असतो. निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने महायुतीला विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील ठप्प कामं आम्ही वेगाने पुढे नेली. विकास आणि कल्याणकारी योजना आम्ही लागू केल्या, ज्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जातील,” असे शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदासाठी संभ्रम नाही
‘तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची मागणी आहे का?’ या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “सहाजिकच जनतेच्या मनात भावना असतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल.”
शिवसेनेच्या मागण्या आणि चर्चेचा मुद्दा
शिवसेनेला गृह आणि महसूल खातं हवं असल्याची मागणी असल्याच्या चर्चेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्व गोष्टींची चर्चा सुरू आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. सत्ता हे माध्यम आहे, आमचं लक्ष्य लोकांची सेवा करणं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचं लक्ष सरकार स्थापनेवर
राज्यातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणाला मिळणार? यावर येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.