
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार सिद्धार्थ खरात यांचा तलवार फिरविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना चिखली तालुक्यातील ऐनखेड गावात एका लग्नाच्या वरातीत घडली. व्हिडिओमध्ये आमदार खरात तलवार हातात घेऊन जल्लोष करताना दिसत आहेत.
पोलिसांनी स्वतःहून दखल घेत अमडापूर पोलिस ठाण्यात आमदार खरात आणि त्यांना तलवार पुरविणारे कार्यकर्ते अनिल यादवराव मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून, संबंधित तलवार जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र हाताळण्यावर कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकारामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे.