
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने अंदमानात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशभरात मान्सूनचे आगमन वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातही मान्सून पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासूनच पूर्वमान्सून पावसाला सुरुवात झाली असून, येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा पहिला टप्पा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 105 टक्के पावसासह राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्येही यंदा चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शेती, जलस्रोत व्यवस्थापन आणि नागरिकांच्या दृष्टीने ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता सर्वांची नजर 6 जूनकडे लागली आहे, जेव्हा मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल होईल.