
मुंबईतील चेंबूर परिसरात मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सदरुद्दीन खान (वय ५०) यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी बाईकवरून येत ४ ते ५ गोळ्या झाडल्या. हे हल्लेखोर डायमंड सिग्नलजवळ खान यांच्या गाडीला लक्ष्य करत जवळून गोळीबार करून घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना सायं. ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
वाहतूक ठप्प, परिसरात तणावाचे वातावरण
ही खळबळजनक घटना घडल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. एक लेन बंद करण्यात आली असून, दाट लोकवस्तीमुळे आधीच वाहतुकीची कोंडी असलेल्या या मार्गावर अधिकच गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
आरोपींचा शोध सुरू, सीसीटीव्हीचा तपास
हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू आहे. पोलीस उपायुक्त ढवळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
सदरुद्दीन खान यांची प्रकृती स्थिर
सदरुद्दीन खान यांना तातडीने चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे.
पुढील तपास सुरू
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या हल्ल्यामागील नेमकी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. मात्र, ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.