
तुळजापूरसारख्या धार्मिक आणि शांत ठिकाणी एक धक्कादायक ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली असून, त्यामध्ये काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
या प्रकरणात संगीता गोळे ही मुख्य आरोपी आहे. तिचा पती वैभव गोळे आणि दुसरा आरोपी पिंटू मुळे यांची मुंबईमध्ये ओळख झाली होती. या ओळखीतूनच दोघांमध्ये ड्रग्जचा व्यवहार सुरू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ड्रग्ज व्यवहाराची साखळी
पिंटू मुळेचा तुळजापुरात ड्रग्जशी संबंध सुरू झाला तो चंद्रकांत उर्फ बापू कने या व्यक्तीमुळे आणि बापू कनेच्या संपर्कातून अजून काही लोक या प्रकरणात ओढले गेले. त्यानंतर ड्रग्ज मुंबईहून ५ ग्रॅमच्या पुड्यांमध्ये पाठवलं जायचं. हे ड्रग्ज तुळजापुरात येताच २.५ ग्रॅमच्या दोन पुड्यांमध्ये विभागलं जायचं आणि स्थानिक बाजारात विकलं जायचं. एक ग्रॅम ड्रग्जची किंमत सुमारे ३००० रुपये इतकी होती, त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर नफा देणारं तस्करीचं रॅकेट होतं. हे ड्रग्ज एका आरोपीच्या हॉटेलमधून वितरित केलं जायचं, ज्यामुळे पोलिसांना या हॉटेलवर विशेष लक्ष द्यावं लागलं.
मुंबई-तुळजापूर ड्रग्ज रूट
हे ड्रग्ज मुंबईहून सोलापूर मार्गे तुळजापूरमध्ये येत होतं. या रुटवर काम करणाऱ्या काही लोकांनी मदत केली होती, असंही समोर आलं आहे. पोलिसांनी सोलापुरातूनही काही आरोपींना अटक केली आहे.
तुळजाभवानी मंदिरातही गोंधळ – १३ पुजाऱ्यांचा संबंध
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तुळजाभवानी मंदिरातील काही पुजाऱ्यांचं ड्रग्ज तस्करीशी संबंध असणं. या प्रकरणात १३ पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पुजारी केवळ धार्मिक कामापुरते मर्यादित नव्हते, तर ड्रग्ज पेडलर म्हणूनही काम करत होते. मंदिर प्रशासनाने पोलिसांकडून या आरोपी पुजाऱ्यांची अधिकृत यादी मागवली आहे. मात्र, पुजारी मंडळाने यावर नाराजी व्यक्त केली असून, सर्व पुजाऱ्यांवर संशय घेणे चुकीचे असल्याचं मत मांडलं आहे. आरोपी पुजारी हे देवीच्या दररोजच्या पूजेमध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे इतर पुजाऱ्यांची बदनामी होऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सध्याची परिस्थिती
पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत ३५ जणांना अटक केली आहे. त्यापैकी २१ आरोपी अजूनही फरार आहेत. तुळजापुरात सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कवर कडक कारवाई सुरू आहे. ही संपूर्ण घटना तुळजापूरसारख्या श्रद्धास्थळी घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनावरही दबाव वाढला आहे की, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मंदिराच्या पवित्रतेला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी.