
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, रुग्णालय प्रशासनाविरोधात गंभीर आरोप होत आहेत. रुग्णालयाने उपचार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची आगाऊ रक्कम मागितल्यामुळे उपचारास विलंब झाला आणि तनिषा यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन समित्यांपैकी राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (7 एप्रिल) सादर झाला असून त्यात रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणावर आता शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर धक्कादायक आरोप करत रुग्णसेवेतील असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“कपड्यांवरून रुग्णांशी वागणूक ठरवतात”
धंगेकर म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण येतात. मात्र तिथे रुग्णांना त्यांच्या कपड्यांवरून, आर्थिक परिस्थिती पाहून वागणूक दिली जाते. संचालक स्वतःला मालक समजून वागतात आणि त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणी काही म्हणू शकत नाही.”
“शासकीय सवलती असूनही थकबाकी”
ते पुढे म्हणाले, “मंगेशकर कुटुंबाचे योगदान देशासाठी मोलाचे आहे, पण रुग्णालय आणि कुटुंब हे वेगवेगळे घटक आहेत. या रुग्णालयाला सरकारने मोक्याच्या ठिकाणी जागा विनामूल्य दिली आहे. तरीही पुणे महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक दंड आकारण्यात आलेला असून तोही भरलेला नाही.”
“शासनाने ताब्यात घ्यावे”
धंगेकर यांनी शासनाकडे मागणी केली की, “या रुग्णालयाचा व्यापारी उपयोग होतो आहे. इथे कुठल्याही नियमानुसार काम केले जात नाही. त्यामुळे शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा. जेणेकरून रुग्णांना न्याय मिळेल.”
या प्रकरणावर अजूनही विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे. मात्र या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.