
मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आरसा आहे.
मुंबईतील जुहू येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमधील नववीच्या वर्गात शिकणारा के. शक्तीवेल या विद्यार्थ्याला फक्त उशीर झाल्यामुळे परीक्षेला बसू देण्यात आलं नाही. हा विद्यार्थी आजारी होता. नेहरू नगरमधील एका साध्या, गरीब कुटुंबातून आलेला. जेव्हा तो अखेरच्या आशेने शाळेत पोहोचला, तेव्हा त्याला फक्त एकच उत्तर मिळालं – “माफ करा, तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही.” वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्यात आलं, पण त्या काही मिनिटांच्या गोंधळात, तो मुलगा मानसिकदृष्ट्या कोसळला.
काही वेळांनी तो घरी परत गेला आणि तिथेच त्याने स्वतःचं स्वतःच्या घरी गळ फास घेऊन आत्महत्या केली. एका परीक्षा केंद्राच्या दारात थांबलेलं स्वप्न, आयुष्याला लागलेला शिक्का आणि एक पोरकी वेदना. यापेक्षा भयंकर काय असू शकतं?
शक्तीवेलच्या कुटुंबाने शाळेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना न्याय हवा आहे, पण या घटनेने आपण सर्वांनी थबकून विचार करण्याची गरज आहे. आपण मुलांना काय शिकवतोय? अभ्यासाची शिस्त की मानसिक दडपण? शाळा म्हणजे जिथे ज्ञान मिळतं, की जिथे संवेदना हरवतात?
आज शक्तीवेल नाही पण उद्या पुन्हा असं कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी आता शिक्षण व्यवस्थेने मनापासून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.