
बँकॉक | म्यानमार — थायलंड आणि म्यानमारमध्ये आज दुपारी जबरदस्त भूकंप होऊन अनेक भाग हादरले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवली गेली असून, भूकंपामुळे दोन्ही देशांतील काही भागांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. भूकंपामुळे बँकॉक शहरासह म्यानमारमधील अनेक भाग हादरले. अनेक उंच इमारतींना तडे गेले असून, लोक भीतीने रस्त्यांवर पळत सुटले.
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सागाइंगजवळ
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील सागाइंग या भागात होता. दुपारी स्थानिक वेळेनुसार भूकंपाचे झटके जाणवले. भूगर्भात अंदाजे १० किलोमीटर खोल हा भूकंप झाला. झटके इतके तीव्र होते की बँकॉकसह म्यानमारच्या अनेक भागांतील मोठ्या इमारती अक्षरशः थरथरल्या.
बँकॉकमध्ये उंच इमारत कोसळली
भूकंपाचा परिणाम बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. शहरातील एका उंच गगनचुंबी इमारतीचा काही भाग कोसळल्याचे स्थानिक माध्यमांनी कळवले आहे. विशेष म्हणजे, ही इमारत अद्याप बांधकामाधीन होती. यावेळी त्या परिसरात असलेले कामगार आणि नागरिक धावपळ करत बाहेर पडताना दिसले. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Earthquake of magnitude 7.2 on the Richter scale hits Myanmar, says National Center for Seismology. pic.twitter.com/k0RQVKfbsZ
— ANI (@ANI) March 28, 2025
म्यानमार आणि थायलंडमध्ये घबराट
भूकंपाच्या तीव्र झटक्यांमुळे दोन्ही देशांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागी आश्रय घेतला. म्यानमारच्या काही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे. भूकंपामुळे काही भागांत इमारतींना तडे गेल्याचेही वृत्त आहे.
भारतातसुद्धा भूकंपाचे सौम्य हादरे
या भूकंपाचे सौम्य हादरे भारताच्या ईशान्य भागात देखील जाणवले. विशेषतः मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, तसेच दिल्ली-एनसीआर, नोएडा आणि गाझियाबाद भागात हलकेसे झटके जाणवले. काही भागांत लोक घाबरून घराबाहेर आले होते. सुदैवाने भारतात कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.
जीवितहानी आणि नुकसानाबाबत अधिकृत माहिती प्रतीक्षेत
सध्या म्यानमार आणि थायलंडमध्ये बचावकार्य सुरु असून, प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत आहे. यामध्ये नेमके किती वित्तहानी आणि जीवितहानी झाली याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर हादऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल
भूकंपानंतर लगेचच सोशल मीडियावर विविध शहरांतील व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यामध्ये लोक भेदरलेले, घाबरलेले आणि धावत सुटलेले दिसत आहेत. काही ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे.