
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीमध्ये पहिल्या शिवमंदिराचे उद्घाटन सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. किल्ल्याच्या रचनेप्रमाणे उभारण्यात आलेल्या या मंदिराला शिवप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापन समितीने केले आहे. तसेच या मंदिराला तातडीने तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
मंदिराची वैशिष्ट्ये
या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनीच ही साडेसहा फूट उंचीची मूर्ती साकारली आहे. मंदिराच्या रचनेत गडकिल्ल्यांची झलक असून, एकूण २,५०० चौरस फूट क्षेत्रफळात हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
मंदिराच्या भोवती ५,००० चौरस फूट तटबंदी उभारण्यात आली आहे, ज्यामध्ये मजबूत बुरूज आणि भव्य महाद्वार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची तब्बल ४२ फूट असून त्यावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराला एकूण पाच कळस असून, संपूर्ण मंदिर परिसरात दगडी बांधकामाचा उपयोग करण्यात आला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ४२ फूट उंचीचे सभामंडप असून, त्याभोवती गोलाकार बुरूज आणि टेहळणी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवरायांच्या जीवनावर आधारित शिल्पे
मंदिराच्या तटबंदीच्या आतील भागात एकूण ३६ विभाग असून, प्रत्येक विभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवणारी भव्य शिल्पे साकारण्यात आली आहेत. यामध्ये शिवरायांचा जन्म, राज्याभिषेक आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवलेले प्रसंग यांचा समावेश आहे. तसेच, या मंदिरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमाही स्थापन करण्यात आल्या आहेत, त्यामुळे हे मंदिर केवळ शिवप्रेमींसाठी नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी जनतेसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले, “महाराजांचं मंदिर म्हणजे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर हे महाराष्ट्राच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. आज आपण आपली धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख टिकवून ठेऊ शकलो, याचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. त्यांच्या दर्शनाशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन अपूर्ण आहे.”
ते पुढे म्हणाले, “हे मंदिर म्हणजे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर येथे इतिहासाचे भव्य दर्शन घडते. मंदिराच्या परिसरात शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग कोरण्यात आला आहे. ही वास्तू म्हणजे एक राष्ट्रमंदिर असल्याचे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.”
शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असलेल्या या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यातील मोठा भाग शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. ह. भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी या मंदिराची रचना तयार केली आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक ठरणार आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.