पत्रकारिता म्हणजे सत्याचा शोध घेऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याची कला, एक जबाबदारी, आणि लोकशाहीचा आधारस्तंभ. मात्र, आजच्या काळात पत्रकारितेचे मूळ उद्दिष्ट हरवत चालले आहे. जेथे पत्रकार समाजाचा प्रहरी आणि जनतेचा आवाज असायला हवा होता, तिथे तो फक्त आदेश पाळणारा कामगार बनून राहिला आहे.
कधीकाळी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, आणि समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकारांनी आज आपल्या स्वतंत्र विचारांची ओळख गमावली आहे. मोठ्या प्रसारमाध्यमांच्या व्यापारिक आणि राजकीय स्वार्थांपायी पत्रकार फक्त त्यांच्या संपादकांच्या किंवा मालकांच्या इच्छांचे पालन करताना दिसत आहेत. त्याला आता ना सत्ता प्रतिष्ठानाला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य राहिले आहे, ना सामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर मांडणी करण्याची हिंमत.
प्रसारमाध्यमे आता व्यवसायाच्या विळख्यात अडकली आहेत. टीआरपीच्या शर्यतीत सत्य लपवले जात आहे आणि सनसनाटी बातम्या विकल्या जात आहेत. ज्या माध्यमांनी लोकशाहीची अभिव्यक्ती बनायचे होते, तीच आता सरकारी आणि आर्थिक दबावाखाली वाकली आहेत. यामुळे जनतेचा माध्यमांवरील विश्वास उडत आहे, आणि या विश्वासघाताची किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागत आहे.
पत्रकारिता ही कधीच केवळ नोकरी नव्हती; ती समाजसेवा होती. मात्र आज, पत्रकार कामगार झाला आहे. त्याला कमी वेतन, अस्थिर नोकरी, आणि प्रचंड कामाचा ताण यांचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या काळात जास्त पगार देऊन पत्रकारांचा तात्पुरता वापर केला जातो, आणि नंतर त्यांना कामावरून काढून टाकले जाते. ही परिस्थिती केवळ पत्रकारांसाठीच नाही तर समाजासाठीही चिंताजनक आहे. जर पत्रकारच आपल्या हक्कांसाठी लढू शकत नाही, तर तो जनतेच्या हक्कांसाठी कसा लढेल?
पत्रकारिता ही लोकशाहीची ताकद आहे, परंतु आज ती कमकुवत झाली आहे. या अधोगतीला थांबवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपल्या मुळ उद्दिष्टांकडे वळावे लागेल. पत्रकारांना योग्य मानधन, स्थिरता, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, पत्रकारिता फक्त व्यवसाय राहील, आणि समाजात सत्याचा आवाज कायमचा हरवेल.
ही लढाई पत्रकारांचीच नाही, तर समाजाची आहे. चौथ्या स्तंभाला सावरण्यासाठी आजच उपाययोजना केल्या नाहीत, तर उद्या लोकशाहीलाही वाचवणे अशक्य होईल.
पाहा जागृत, रहा जागृत
संपादक अमोल भालेराव,मुंबई