
मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण नव्हते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात परभणी आणि बीडमधील हत्याकांड तसेच दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याने आठवले यांची अस्वस्थता अधिकच वाढल्याचे दिसत आहे. यामुळे एन.डी.ए आणि महायुती सरकारवर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
याच पार्श्वभूमीवर, रामदास आठवले १९ डिसेंबर रोजी सहकुटुंब दुबईला रवाना झाले आहेत. २५ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असून, त्या दिवशी मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील पावलाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.