
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने या निकालांना जनतेचा स्पष्ट कौल म्हणत यशाचा आनंद साजरा केला आहे. मात्र, विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. या वादात आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीही सहभाग नोंदवला आहे.
मतांच्या आकडेवारीवर संशय परकला प्रभाकर यांनी मतांच्या टक्केवारीवर संशय उपस्थित करत मतदान प्रक्रियेतील विसंगती मांडली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का ५८.२२% होता, जो जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार मतांपर्यंत पोहोचत होता. मात्र, काही तासांतच म्हणजे रात्री ११.३० वाजता हा टक्का ६५.०२% पर्यंत वाढून तो ६ कोटी ३० लाख ८५ हजार मतांवर पोहोचला. यावर प्रभाकर म्हणतात, “संध्याकाळी पाच वाजून गेलेल्यावर थोड्याच वेळात तब्बल ६५ लाख ९७ हजार मतांची भर पडली कशी?”
मतमोजणीपूर्वीही वाढलेले मतांचे प्रमाण फक्त मतदानाच्या दिवशीच नाही, तर मतमोजणी सुरू होण्याच्या अगोदरही मतांच्या आकडेवारीत ९ लाख ९९ हजार मतांची भर पडल्याचा दावा प्रभाकर यांनी केला. परिणामी, एकूण ७५ लाखांहून अधिक मतांची वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. प्रभाकर यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत “निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आणि अंतिम आकडेवारीतील फरक आजवर कधीही १% च्या पुढे गेलेला नाही. मात्र, यंदा हा फरक ७.८३% इतका मोठा आहे,” असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगावर संशय मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी रांगेतील मतदारांच्या मतांमुळे आकडेवारीत फरक झाल्याचा निवडणूक आयोगाचा दावा आहे. परंतु, प्रभाकर यांनी यावरही प्रश्न उपस्थित केले. “इतक्या मोठ्या प्रमाणात मतांची भर पडणे निवडणुकीच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टता द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरोधकांचे दावे आणि सत्ताधाऱ्यांचे प्रतिवाद ईव्हीएम हॅकिंग आणि मतमोजणी प्रक्रियेतील संभाव्य त्रुटींवर विरोधकांनी आरोप करत निवडणूक आयोगाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर, सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी या निकालांना लोकशाहीचा विजय मानले आहे. या पार्श्वभूमीवर परकला प्रभाकर यांचे विधान वादग्रस्त ठरले असून यामुळे राजकीय वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सत्य समोर येईल का? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे हे निकाल फक्त विजय-पराभवापुरते मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. या चर्चेतून निवडणूक आयोगावरचा विश्वास कसा परत येतो आणि या आरोपांवर आयोग काय उत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे पती परकला प्रभाकर यांनी विधानसभा मतदान व मतमोजणी संदर्भात केलेले विश्लेषण लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकासाठी चिंतनीय आहे. महाराष्ट्रात मतदानादिवशी ५.३० नंतर मतांच्या टक्केवारीत झालेली लक्षणीय वाढ ही हरयाणा विधानसभेप्रमाणेच होती.… pic.twitter.com/eQts7XCeP6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2024